

Attempted self-immolation by climbing on the roof of the tehsil
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोठा दाभाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली नोकर भरती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी कोठा दाभाडी येथील प्रल्हाद शेषराव निलक या तरुणाने शनिवार १८ ऑक्टोबर रोजी भोकरदन तहसील कार्यालयाच्या छतावर चढून अंगावर रॉकेल सारखा ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही बाब लक्षात येताच गटविकास अधिकारी महेंद्र साबळे व नायब तहसीलदार अविनाश पाटील यांनी मध्यस्थी करून त्यांना आत्मदहन करण्यापासून थांबविले.
प्रल्हाद शेषराव निलक व गावकऱ्यांनी यापूर्वी पंचायत समिती भोकरदन येथे व इतर ठिकाणी निवेदन देऊन मागणी केली होती की, ग्रामपंचायत कोठा दाभाडी यांनी जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी भरताना कोणत्याही शासकीय नियमांचे पालन केले नसून पारदर्शकरीत्या भरती न करता संगनमताने कर्मचारयांची भरती केली आहे. सदर नोकर भरती रद्द करून नव्याने जागा भरण्यात याव्यात नसता आम्ही सामूहिकरीत्या आत्मदहन आंदोलन करू. मात्र त्यांच्या मागणीची योग्य दखल न घेतल्या गेल्याने प्रल्हाद निलक यांनी काही सहकाऱ्यांसह शनिवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी भोकरदन तहसील कार्यालय गाठले व मुख्य प्रवेशद्वारा शेजारील लिंबाच्या झाडावरून तहसील कार्यालयाच्या गच्चीवर जाऊन स्वतःच्या अंगावर रॉकेलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून घेतला.
तहसील कार्यालयाला सुट्टी असल्याने कार्यालयात फारसे कोणी नव्हते मात्र सध्या पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत सुरू असल्याने तहसीलदार त्या ठिकाणी गेले होते. तर नायब तहसीलदार अविनाश पाटील हे याच निमित्ताने भोकरदन तहसील कार्यालयात उपस्थित होते. सदर बाब त्यांच्या व गटविकास अधिकारी महेंद्र साबळे व तहसील कार्यालय परिसरात साध्या वेशात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्याही ही बाब लक्षात आल्याने त्यांनी लगेच धावपळ करून प्रल्हाद निलक यांना आत्मदहन करण्यापासून थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.
गटविकास अधिकारी साबळे व नायब तहसीलदार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसेवक ग्रामपंचायत कोठा दाभाडी यांनी आंदोलन करताना लेखी पत्र देऊन कळविले की, जलजीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र, मोटार मेकॅनिक, फिटर या ट्रेडची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र ही भरती रद्द करण्यात आली असून अद्यापपर्यंत कुणालाही कामावर रुजू करून देण्यात आले नसून यानंतर जेव्हा केव्हा भरती करायची असेल ती जाहीर प्रगटन काढून व शासकीय नियमाप्रमाणेच करण्यात येईल, असे लेखी पत्र ग्रामपंचायत अधिकारी एस.डी. भारती व एस. पी. दौड, तालुका कॉरनेटर, नवोदय कृषी संशोधन तालुका भोकरदन यांनी लेखी स्वरूपात दिल्यानंतर हे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले.