

जालना ः जालना शहरातील बाजारपेठेत संक्रांत सणामुळे महिलांनी वाणाच्या सामानासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीनिमित्त बाजारात विविध वाणांचे सामान दाखल झाले असून महिला बजेटनुसार ते खरेदी करताना दिसत आहेत.
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत स्नेह अन् आपुलकी वाढविणारा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीचा सण बुधवार (दि. 14) रोजी उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त सणाची तयारी सुरू झाली असून, त्यासाठीच्या खरेदीसाठी महिलांची लगबग पहायला मिळत आहे. मंगळवार (दि. 13) रोजी भोगी आहे.
संक्रांतीसाठी पूजेच्या साहित्यांपासून ते तीळगूळ खरेदीपासून सुगड खरेदीपर्यंत महिला-तरुणीं खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. संक्रांतीसाठी रांगोळी, लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणारे दागिने आणि हलव्याच्या दागिन्यांचीही खरेदी बाजारात होत आहे.
संक्रांतीच्या पुजेसाठी लागणारे गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तीळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची खरेदी महिला ऐनवेळी करतात. सध्या महिला बाजारात आपल्या बजेटप्रमाणे वाणाचे सामान व साड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत अंदाज घेताना दिसत आहेत.
रांगोळी बाजारात
बाजारात तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. हलव्याच्या दागिन्यांसह लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दागिन्यांसह रांगोळीही बाजारात आली आहे.