

परतूर ः राज्य शासनाच्या धोरणानुसार नाफेडमार्फत राज्यभरात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळावा, हा शासनाचा उद्देश आहे. तथापि, या खरेदी प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असणारा बारदाना (पोती) अद्याप अनेक खरेदी केंद्रांवर उपलब्ध न झाल्याने शेतकरी तसेच हमीभाव खरेदी केंद्र संचालक अडचणीत सापडले होते.
आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह जालना जिल्हा डीएमओ यांना संपर्क करून तातडीने बारदाना (पोती) उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केली. या अनुषंगाने उद्या दिवसभरात बारदाना (पोती) उपलब्ध होतील अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांसह संबंधित हमीभाव खरेदी केंद्र संचालकांनी या संदर्भात वारंवार आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रारी व मागण्या सादर केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत आमदार बबनराव लोणीकर यांनी तातडीने नाफेड प्रशासनाशी थेट संपर्क साधून या प्रश्नावर ठोस कार्यवाही सुरू केली.
या अनुषंगाने आमदार बबनराव लोणीकर यांनी नाफेडचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करून, सोयाबीन खरेदीसाठी आवश्यक असणारा बारदाना तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट आणि ठाम सूचना दिल्या. यासोबतच नाफेडचे जिल्हा विपणन अधिकारी यांनाही दूरध्वनीद्वारे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या हस्तक्षेपानंतर आमदार बबनराव लोणीकर यांनी माहिती दिली की, उद्यापर्यंत परतूर व मंठा तालुक्यातील सर्व हमीभाव खरेदी केंद्रांवर आवश्यक असलेला बारदाना (पोती) उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यात येईल.
आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित कोणताही प्रश्न दुर्लक्षित केला जाणार नाही. शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने व तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार लोणीकरांकडे केली होती मागणी
सदर प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेला तातडीचा आणि परिणामकारक हस्तक्षेप हा शेतकरी हितासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे ठळक उदाहरण असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते कायम कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधींसह सतीशराव निर्वळ रमेश भापकर गजानन लोणीकर नितीन सरकटे ओमप्रकाश मोर बाळासाहेब चव्हाण दिगंबर अवचार राजेश भुतेकर निर्दास राठोड संतोष खंदारे यांच्यासह अनेकांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे मागणी केली होती.