

जालना : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दुसरा अंतर्गत महाराष्ट्रातील हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस घोषित झालेल्या गावांचे आता तृतीय-पक्षीय पडताळणीद्वारे अधिकृत प्रमाणन देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी शासनाने एएफसी इंडिया लिमीटेड या संस्थेची नेमणूक केली आहे. यात जालना जिल्ह्यातील सुमारे 745 गावांची ॲपद्वारे पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, एएफसी इंडिया लिमिटेड आणि विशाल बहुउद्देशीय संस्थेच्ा संयुक्त विद्यमाने या संदर्भात घेण्यात आलेले प्रशिक्षण पार पडले. या पडताळणीमुळे राज्यातील ग्रामीण स्वच्छता अभियानाला अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.
ही संकल्पना केवळ उघड्यावर शौचमुक्ततेपुरती मर्यादित नसून, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची नियमित देखभाल, तसेच स्वच्छता सवयींची सातत्यपूर्ण अंमलबजावणी यांचा समावेश करते. तृतीय-पक्षीय प्रमाणनामुळे स्वच्छ भारत मिशनला बळ येणार आहे.
प्रशिक्षणाप्रसंगी एएफसी संस्थेचे केशव घिगे, दिगंबर झरेकर, प्रशांत मांजरे, गौतम नारनवरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विशाल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भास्कर उघडे यांच्यासह सहभागी एम.डी. सरोदे, विष्णू पिवळ, श्री राजपूत, बी. एस. सय्यद, शिवाजी तायडे, मोहिनी मानकर, गजानन उदावंत आदींची उपस्थिती होती.
745 ग्रामपंचायतींची होणार पडताळणी
एएफसी आणि विशाल बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ॲपद्वारे गावातील वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापनाची सोय, कचरा कुंड्या, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसह इतर बाबींची पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 745 ग्रामपंचायतींची ॲपद्वारे माहिती भरली जाणार आहे.
तीन महिलांना करणार प्रशिक्षित
स्वच्छतेची जाणिव जागृती वाढावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक गावातील सुमारे 3 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हे प्रशिक्षण वर्ग लवकरच भरवले जाणार आहे. त्यासाठी प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षणही पार पडले आहे. त्यामुळे गावाच्या स्वच्छता चळवळीला बळ मिळणार आहे.