

Sand-laden tractor seized at Javkheda
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवाः जाफ्राबाद तालुक्यातील पूर्णा, धामणा व केळणा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी अखेर महसूल प्रशासनाने दंड थोपटले आहेत. जाफ्राबादचे तहसिलच्या पथकाने मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रंगेहाथ पकडला. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी, जवखेडा, कुंभारझरी, वरूड या भागातील पूर्णा-धामणा नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. दिवसभर नदीपात्र शांत आणि रात्री ११ नंतर ट्रॅक्टरच्या फेऱ्या सुरू, असा नित्याचा प्रकार होत होता.
याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. अखेर तहसीलदार मंगेश साबळे यांना मिळालेल्या माहीतीवरुन रविवार (२०) रोजी मध्यरात्री नंतर जवखेडा येथे ग्राम महसूल अधिकारी आर. आर. गायके, जी. एन. तांगडे, अरुण श्रीराम पवार व महसूल कर्मचारी केळणा नदीपात्रालगत नदीपात्रातून अवैधरित्या वाळू भरून काळ्या रंगाच्या ट्रॅक्टर मधुन नेत असताना महसूल पथकाने घेराव घालून ट्रॅक्टर पकडला. यावेळी चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारातही पथकाने शिताफीने ट्रॅक्टर चालकाना ताब्यात घेतले..
सदर वाळुचा ट्रॅक्टर व ट्रॉली तात्काळ जाफ्राबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.. तेथे पंचनामा करून जप्तीची पावती घेण्यात आली. या ट्रॅक्टर मालकावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गोण खनिज कायद्यानुसार लाखो रुपयांचा दंड व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत सुरू झाली आहे.
कारवाया सुरूच राहणार
याबाबत ग्राम महसूल अधिकारी आर. आर. गायके यांनी सांगितले की, तहसीलदारांच्या आदेशाने मध्यरात्री गस्त घालत होतो. जवखेडा येथे अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर मिळून आला. तो जप्त करून पोलीस ठाण्यात लावला आहे. यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील.