

Ginger, garlic, and pomegranates see a surge in prices at the market committee
जालना, पुढारी वृत्तसेवाः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (रामनगर, नेर, शेवली उपबाजार) शनिवार, दि. १९ रोजी फळे व भाजीपाल्याची मोठी आवक झाली. बाजारपेठेत अद्रक, लसूण, लिंबू आणि डाळिंब या शेतमालाला जोरदार मागणी राहिल्याने त्यांचे भाव तेजीत राहिले. तर दुसरीकडे कोथिंबीर व मेथी या पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव ग्राहकांसाठी आवाक्यात राहिले आहेत. दिवसभरात फळे व भाजीपाला विभागातून एकूण ८ लाख ९९ हजार २७२ रुपयांची उलाढाल झाली.
फळ विभागात सफरचंदाची सर्वाधिक ९७ कॅरेट आवक झाली. सफरचंदाला किमान ८०० तर कमाल ३,६०० रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला. डाळिंब फळपिकांची ५८ कॅरेट आवक झाली असून डाळिंबाने कमाल ३,५०० रुपये (सरासरी २,००० रुपये) प्रति कॅरेटचा पल्ला गाठला. ड्रॅगन फ्रूटची ४४ कॅरेट आवकसह कमाल ३,००० रु. व सरासरी १,८०० रुपये प्रति कॅरेट दर मिळाला. संत्र्याची ३९ कॅरेट आवक होऊन कमाल १,७०० रु. तर पेरूला १८ कॅरेट आवकमध्ये कमाल १,८०० रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला.
फळ विभागातील शेतमालाचे मूल्यांकन ४ लाख ५३ हजार ६५३ रुपये झाले. भाजीपाला विभागात विशेषतः अद्रक, लसूण आणि लिंबाच्या दराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अद्रक अवघ्या ४.२ क्विंटल आवकेमध्ये अद्रकला कमाल १६,३०० रुपये प्रति क्विंटल (सरासरी ५,८०० रु.) असा भाव मिळाला. लसणाची ५.२ क्विंटल आवक झाली असून, लसूण कमाल १४,००० रुपये प्रति क्विंटल (सरासरी ७, २०० रु.) दराने विकला गेला. लिंबाची १.२ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला कमाल १२,००० रुपये प्रति क्विंटल (सरासरी ६,५०० रु.) भाव मिळाला.
कांदा, बटाटा व टमाटे कांद्याची ३२.६ क्विंटल आवक होऊन कमाल ४,५०० रु. (सरासरी २,८०० रु.), आलूची (बटाटा) ५३.२ क्विंटल आवक होऊन सरासरी ६५० रु., तर टमाट्याची १५.९ क्विंटल आवक होऊन सरासरी १,२०० रुपये प्रति क्विंटल दर राहिला.
कोथिंबिरीची २,१७६ जुड्यांची मोठी आवक होऊन सरासरी दर १०० रुपये राहिला. मेथीची १,८५० जुड्या आवक होऊन सरासरी २०० रुपये दर मिळाला. एकूण उलाढालः भाजीपाला व इतर शेतमालाचे मूल्यांकन ४ लाख ४५ हजार ६१९ रुपये नोंदवले गेले.