

जालना: शहरातील गांधीनगर मल्लाव गल्लीकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांनी सोमवार, दि.१५ रोजी सायंकाळी धाडसी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर दारू बाळगून त्याची चोरटी विक्री करताना रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ३ हजार ५०० रुपये किमतीची ३५ लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून, दुर्गंधीयुक्त व नाशवंत असल्याने ती पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केली आहे.
दि. १५ रोजी सायंकाळी १७:१० वाजताच्या सुमारास गांधीनगर मल्लावगल्लीकडे जाणाऱ्या रोडवर भवरे मच्छीवाल्याच्या बाजूला एक इसम गावठी हातभट्टीच्या दारूची चोरटी विक्री करत आहे.
माहिती मिळताच पथकाने छापा टाकला. एक इसम दारूची विक्री करताना मिळून आला. तुषार सचिन आडीगोपूल (२२ वर्ष, रा. रामनगर विनकर कॉलनी, जालना) याला ताब्याडत घेतले. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्या बाजूला एक काळ्या रंगाचा ३५ लिटरचा कॅन मिळून आला, ज्यामध्ये अंदाजे ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू (प्रति १०० रुपये लिटरप्रमाणे एकूण किंमत ३,५००/- रुपये) होती. उर्वरित दारूचा साठा हा दुर्गंधीयुक्त आणि नाशवंत असल्यामुळे कॅनसह जागेवरच तोडून नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस हवालदार सुभाष तुकाराम पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी तुषार सचिन आडीगोपूल याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.