

Illegal Liquor Sellers on Police Radar; Liquor Worth ₹3 Lakhs Seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अवैध दारुसह इतर धंद्याबाबत अलर्ट मोडवर आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात जालना शहरातील कदीम जालना, चंदनझिरा तसेच परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात पोलिसांनी कारवाई करुन जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल पकडला.
जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यासह संजय नगर व नुतन वसाहत परिसरात कदीम जालना पोलिसांनी छापा टाकुन २ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे १ लाख ८९ हजाराचे सुमारे २१०० लिटर रसायन तसेच २८० लिटर तयार गावठी दारू, १० सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य असा २ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले रसायन व दारू जागीच नष्ट करण्यात आली. पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी व्यवसायावर एमपीडीए अंतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेघवीरसिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि अमित म्हस्के, पोउपनि डी.एस.मोरे कैलास जायभाय, जमादार चव्हाण, पोलिस कर्मचारी किरण चेके, बलराम जारवाल, आशपाक शहा, रामेश्वर राऊत, आदर्श गायकवाड, सदाशिव मुटकुळे यांनी केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी परिसरात एका जणाविरुद्ध गुन्हा
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील चंदनझिरा पोलिसांनी अतिरिक्त औद्योगिक परिसरात छापा टाकून २६ हजार ३६० रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या एका ढाब्यासमोरील मोकळ्या जागेवर एक इसम देशी विदेशी दारुची विक्री करीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देशी व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या १८० एमएल आणि ७५० एमएल क्षमतेच्या बाटल्या जप्त केल्या आहे. आरोपीकडून रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार देशमुख हे करत आहेत.
आष्टी येथे चार हजारांची दारू जप्त
आष्टी : जालना पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत आष्टी परिसरातील एका इसमावर छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत ४ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आष्टी येथील तांबळे वस्ती परिसरात एका इसमाच्या घरासमोर असलेल्या पत्र्याच्या टपरीमध्ये विनापरवाना देशी दारूची विक्री सुरू असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ४८ देशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम तसेच इतर साहित्य असा ४ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलिस ठाणे करीत आहे.