

Rumors of Fuel Shortage; Citizens Scramble for Petrol
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
शहरात पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या अफवांनी घनसावंगी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून वारंवार इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात येत असतानाही बुधवार व गुरूवार, दि. २६ रोजी सकाळपासूनच शहरातील विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
अफवांच्या प्रभावामुळे अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांसह पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली. परिणामी, शहरातील पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. शहरात तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असतानाही नागरिकांनी उन्हाची पर्वा न करता तासन्तास रांगेत उभे राहत इंधन भरले. देशात इंधनाचा पुरवठा सुरळीत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, असे शासनाने स्पष्ट केले असून, अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही सांगण्यात आले आहे.