

Rajegaon's bull market, the footsteps of tradition
शिवनाथ जाधव
टाकरवन : माजलगाव तालुक्यातील राजेगावच्या माळरानावर जेव्हा बैलांच्या गळ्यातील घंटांचा नाद, खुरांचा ठेका आणि व्यापाऱ्यांच्या आरोळ्या घुमत असत, तेव्हा संपूर्ण परिसरात जणू एखादा उत्सव साजरा होत आहे, असेच वाटे. पोळा सणाच्या स्वागताला भरवला जाणारा हा बैल बाजार केवळ खरेदी-विक्रीचा नव्हता, तर तो ग्रामीण संस्कृतीचा हृदय स्पंदन होता.
सन १९७० मध्ये सुरू झालेला हा बैल बाजार, पाच दशकांहून अधिक काळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा दुवा ठरला. जालना, परभणी, नगर, बीडपर्यंतचे व्यापारी आणि शेतकरी राजेगावच्या दिशेने येत. विशेषतः खिल्लार जातीच्या देखण्या बैलांची बोली लागली की वातावरण भारावून जात असे. पोळा सण जवळ आला की इथल्या बाजारपेठेत हजारो लोकांची लगबग सुरू होई.
काळाच्या ओघात बैलांच्या गळ्यातील घंटानाद हळूहळू थांबू लागला. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर यंत्रांच्या धडाक्यात बैलांची गरज उरलीच नाही. कोरोनाच्या संकटाने तर बाजारावर कडेलोट केला. अखेर इसवी सन २०२२ पासून राजेगावचा बैल बाजार कायमचा बंद झाला.
आजही पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो, त्यांना सजवतो, पूजा करतो. पण त्यांच्या डोळ्यात एक हळवा प्रश्न दाटून येतो -कधीकाळी आमच्या राजेगावच्या बाजारात बैलांना मिळणारा तो मान, ती प्रतिष्ठा पुन्हा दिसेल का? राजेगावचा बैल बाजार हा फक्त व्यापारी व्यवहार नव्हता. आज तो बंद झाला असला तरी त्याच्या गाभाऱ्यातील आठवणी, बैलांच्या गळ्यातील मंजुळ घंटानाद आणि व्यापाऱ्यांच्या आरोळ्या हे सारे ग्रामीण संस्कृतीच्या इतिहासात कायमचे कोरले गेले आहेत.
एक दिवस अगोदरच व्यापारी बैल घेऊन येत. बैलांना चारा घालणे, पाणी पाजणे, त्यांची देखभाल करणे यातून गावच्या मजुरांना रोजगार मिळत असे. गावच्या बाजारपेठेतील दुकाने भरभराटीला येत. एखाद्या यात्रेसारखे वातावरण असायचे. आज या गजबजेला विराम मिळाल्याने गावाची आर्थिक धडधड मंदावली आहे. दुकानदार, व्यापारी आणि मजुरांचा उदरनिर्वाह कोलमडून गेला आहे. मात्र इथली बोली, इथला उत्साह, इथले रंग कुठेच मिळत नाहीत. राजेगावच्या बाजाराच्या आठवणी तेथे जाऊन प्रत्येकाच्या मनात उमटतात.