

Gutkha worth Rs 23 lakh seized in Farm
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील काजळा येथे पोलिसांनी छापा टाकून एकूण २३ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सतीश ऊर्फ लाला जैस्वाल रा. जालना हा व्यक्ती काजळा येथील राजू दिलीप पैठणे यांच्या शेतातील आखाड्यावर एका वाहनात गुटखा आणून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरुन अपर पोलिस अधीक्षक कार्यालय जालना यांच्या पथकाने तसेच बदनापूर पोलिसांनी तत्काळ छापा मारला. या कारवाईत २३ लाख ५८ हजारांचा गुटख्यासह वाहन असा एकूण ८० लाख ५८ हजार रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम यांचे फिर्यादीवरून बदनापूर पोलिस स्टेशन येथे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड हे करीत आहे. ही कारवाई बदनापूर पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, विशाल सोळुंके, निखिल गायकवाड, प्रताप सुंदर्डे, शाबान तडवी आदींनी केली.