

Raid on Lodging and Boarding on Bus Stand Road; 8 women rescued
जालना, पुढारी वृत्तसेवा: बसस्टँड रोडवरील लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यवसायाच्या रॅकेटवर अ.मा.वा.प्र. (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष) जालनाने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून ८ पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
तसेच घटनास्थळावरून ६३,९३० रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बुधवार दि. २१ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. लॉजिंगचा मालक अक्षय शिवाजीराव राजूत हा आर्थिक फायद्यासाठी महिलांना बाहेरून आणून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली होती.
यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोउनि. पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला. छाप्यात लॉजिंगचा मालक, मॅनेजरसह विविध ठिकाणचे आरोपी ताब्यात घेण्यात आले. पीडित महिलांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आरोपींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.