

3,744 single parents benefited from childcare support
जालना, पुढारी वृत्तसेवा : एकल आईच्या मुलांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट राहू नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकल मातांच्या मुला-मुलींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, या सर्वेक्षणातून समोर आलेल्या वास्तवाच्या आधारे शासन अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील ३,७४४ मुला-मुलींना थेट सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ होणार आहे.
बहुतांश एकल माता मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यल्प उत्पन्नामुळे शिक्षणाचा खर्च भागवणे त्यांना कठीण जाते. परिणामी, अनेक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा कमी वयातच कामासाठी पाठवावे लागते. याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासावर होत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकार एकल मातांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक साहाय्य योजना राबवणार आहे. या योजनेत शालेय साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती, फी सवलत तसेच आवश्यक ठिकाणी थेट आर्थिक मदतीचा समावेश असणार आहे. शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये, हा या निर्णयामागील शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार जालना जिल्ह्यात एकूण ६९ हजार ३५८ एकल माता आहेत.
त्यांच्यापैकी ३,७४४ मुला मुली सध्या पहिली ते बारावीपर्यंत विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून, एकल मातांमध्ये दिलास्याची भावना आहे. महिन्याला २२५० रुपये मिळणार आहे. यात १८८८ मुले असून १८१६ मुली आहेत.
सध्या एकल पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन व विविध शैक्षणिक अनुदान योजना सुरू आहेत. मात्र, प्रस्तावित विशेष योजनेची सविस्तर रूपरेषा, लाभाचे स्वरूप व निकष शासनाकडून लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.