

A bribe of 10,000 rupees for the second installment of the housing scheme
जालना, पुढारी वृत्तसेवा :
गोरगरिबांच्या हक्काच्या घरासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही हात मारणाऱ्या एका भ्रष्ट अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीच्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी (वय २९, रा. चांदई टेपली, ता. भोकरदन) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २१) जालन्यातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या वडिलांच्या नावावर सन २०२४-२५ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. योजनेचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या वडिलांच्या बँक खात्यावर जमा झाला होता. मात्र, कामाच्या प्रगतीनुसार दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी आरोपी अभियंता ज्ञानेश्वर चौधरी याने ३० डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदार काही कामानिमित्त राज्याबाहेर गेल्याने त्यांचा अभियंत्याशी संपर्क झाला नाही. २१ जानेवारी २०२६ रोजी परतल्यानंतर तक्रारदाराने दुसऱ्या हप्त्याबाबत फोनवर विचारणा केली. त्यावेळी, "ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्याशिवाय दुसरा हप्ता मिळणार नाही," असे आरोपीने स्पष्ट शब्दांत सुनावले. यानंतर तक्रारदाराने थेट जालना एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
हॉटेलमध्ये सापळा अन् कारवाई
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, पंचासमक्ष आरोपीने १० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सतकर कॉम्प्लेक्स येथील हॉटेल विठ्ठला येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताना ज्ञानेश्वर चौधरी याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे करत आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या तत्वाखालील पथकाने केली.
भ्रष्ट अभियंत्याकडे आयफोन आणि गुगल पिक्सल
लाचखोर कंत्राटी अभियंत्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेच्या रक्कमेसोबतच एक आयफोन, एक 'गुगल पिक्सल' मोवाईल आणि एक अंगठी आढळून आली. हे महागडे मोबाईल आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या अभियंत्याकडे इतके महागडे गॅझेट्स आले कोठून? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याच्या घराची झडतीही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.