

Provide subsidies to farmers for seasonal horticulture crops
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी परिस्थितीत मच्छिंद्रनाथ चिंचोली शिवारातील शेतकऱ्यांना हंगामी बागायती पिकांच्या अनुदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी शेतकरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावाची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध सिंचन व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतीची स्थिती लक्षात घेऊन सर्व पात्र शेतकऱ्यांचा हंगामी बागायती अनुदानाच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मच्छिंद्रनाथ चिंचोली शिवाराची भौगोलिक रचना आणि परिसरातील सिंचन प्रकल्पांमुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक कोरडवाहू शेतीऐवजी हंगामी बागायती पिकांची लागवड केली आहे. मांदाळा, देवी दहेगाव तसेच चिंचोली शिवारातील लघुसिंचन तलावांचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळतो.
घनसावंगी तलावांमधून पाईपलाईनद्वारे पाणी शेतापर्यंत नेण्यात आले आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांकडे विहिरी व बोअरवेलची सुविधा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीचा विचार करता शिवारातील अनेक क्षेत्र हंगामी बागायती स्वरूपात येते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले आहे.
खरिप हंगातील पिकांसाठी केलेला खर्च, मशागत, बियाणे, खते आणि औषधांवर झालेला खर्च यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या मदतीचा आधार मिळणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री नोंदी किंवा ठरावीक निकषांमुळे पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रत्यक्ष पाहणीची मागणी
शेतकऱ्यांनी ६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार, घनसावंगी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. मच्छिंद्रनाथ चिंचोली शिवाराची महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करावी. उपलब्ध सिंचन साधने, पिकांची लागवड आणि शेतीची प्रत्यक्ष स्थिती तपासून पात्र शेतकऱ्यांची नावे सन २०२६ च्या हंगामी बागायती अनुदानाच्या यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.