

Promises of Local Leaders for Elections; Indifference regarding Galhati Dam water
शहापूर, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी धरणातील पाण्यासंदर्भात शासन व स्थानिक लोकप्रतिनिधीची उदासीनता असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
अंबड तालुक्यातील दुष्काळी पाहणी दौरा करीत असताना शनिवारी लक्ष्मण हाके यांनी गल्हाटी प्रकल्पाची पाहणी केली. एके काळी जालना सारख्या शहराला पाणीपुरवठा करणारा हा प्रकल्प आज कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे परीसरातील जवळपास २० ते २५ गावातील ग्रामस्थांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यास कारणीभूत शासनाबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
स्थानीक लोकप्रतिनिधी कडून गल्हाटी प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचे आश्वासन फक्त निवडणुकीपुरते शेतकऱ्यांना देण्यात आले होते असा आरोप त्यांनी केला. निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी कडून या गोष्टी कडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. गल्हाटी प्रकल्पातील पाण्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी नी राजकारण न करता येथील शेतकऱ्यांना पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत.
गल्हाटी प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर येथील २० ते २५ गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेकडो हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. गल्हाटी धरणात पाणी आणण्यासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून पाणी आणण्यासाठी गल्हाटी संघर्ष समिती मागील २० वर्षांपासून संघर्ष करीत आहे यासाठी अनेक आंदोलने, रास्ता रोको व मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत परंतु प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही.
पाण्यासाठी लवकरच मोठा लढा
गल्हाटी प्रकल्पात पाणी आणण्यासाठी लवकरच मोठा लढा उभारणार असल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.