

Price hike of chemical fertilizers; Farmers' expenses will increase
जालना, पुढारी वृत्तसेवा: एकाच हंगामात दुसऱ्यांदा झालेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना झटका बसला आहे. पोटॅश खताचे प्रति एक बॅग दरात २७५ रुपयांनी वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सध्या जालना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध, केंद्राचे धोरण, खत निर्यातीत मुख्य देशांनी आखडता हात आणि इंधनाचे वाढलेले दर यामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता पुन्हा इधनाचे दर वाढल्यामुळे रासायनिक खतांची दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येते.
या दरवाडीने मात्र फळबाग, इतर शेती उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी उपयुक्त खते प्रामुख्याने महागली असल्याने ही दरवाढ शेती उद्योगावर संक्रांत पसरवणारी असल्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे. रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या खत कंपन्यांनी प्रत्येक रासायनिक खते व औषधांची लिकिंग सुरु केल्याने विक्रतेसह जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
लिकिंगशिवाय रासायनिक खत न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई काण्यात कृषी विभाग उदासीन असल्याने विक्रेते व शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या नामांकित खतांची रॅक दखल होत आहे, परंतु या खतांच्या बरोबर इतर खते लिकिंग असल्याने विक्रेते ही खते उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली, तसे त्याच्यावरील अनुदानात देखील वाढ करावी.
जेणेकरून रासायनिक खतांच्या किंमती स्थिर राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. कोरोना काळात रासायनिक खतांवर अनुदान होते, ते अनुदान कमी करण्यात आले. त्यामुळे जसे खतांच्या किमतीत वाढ केली तशी अनुदानात वाढ करण्यात यावे. सगळ्यात स्वस्त मिळणाऱ्या युरियाचा फ़क्त भाव स्थिर आहे. पण जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हा युरिया उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
डीएपी ११२३४२
एफओएम २६७
एमओपी २६९५१
एनपीकेएस ५२७०६७
एसएसपी ३७६२५८
युरिया १८१०४६