

Mahadev Munde Murder Dnyaneshwari Munde Met Manoj Jarange at Antarwali Sarati
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा एवढ्या क्रूर पद्धतीने राक्षसांनीसुद्धा कुणाला मारले नसेल, अशा पद्धतीने महादेव मुंडे यांची हत्या झाली. व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला १८ महिने उलटूनही अद्याप मारेकरी सापडत नाही. अनेक तपास अधिकारी बदलले गेले, पतीच्या मारेकऱ्यांचा तपास करा, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केले, तरीही आरोपींना पकडण्यासाठी उशीर का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी (दि.२३) मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीत मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात महादेव मुंडे हत्येप्रकरणी तपासाबाबत चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळी येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांच्या पाठीशी नेहमी उभे रा-हणार असल्याचे सांगितले होते.
त्यांनतर राज्य सरकारने महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर तसेच आजच समोर आलेल्या पोस्टमार्टम अहवालानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेतली. मला महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाचे आश्वासन मिळते, पण पुढे काहीच होत नसल्याची तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली. दरम्यान या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे माझ्या पाठीशी उभे असल्याने मला न्याय मिळेल. त्यांनी माझ्या पाठीशी असेच उभे राहावे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली.
महादेव मुंडेंना न्याय कसा मिळत नाही ते मी बघतो. न्याय मिळावा यासाठी आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करणार आहोत, आम्ही आता तयारीला लागलो म्हणून गृहमंत्र्यांनी समजावे, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी-सीआयडीच्या यंत्रणा अॅक्टिव्ह करा, अशी मागणी जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. काय तपास सुरू आहे, हे आधी कुटुंबाला सांगा, असे म्हणत ज्ञानेश् वरी मुंडे यांचा जाब पोलिसांनी का नाही घेतला, याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असेही जरांगे यांनी म्हटले.