

Jalna shravan somvar shiva temple devotees
जालना, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित असून, मंदिर प्रशासन व स्थानिक समित्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जालना शहरातील पंचमुखी महादेव, मनकामनेश्वर, ढवळेश्वर, थाडेश्वर, कंकणेश्वर, अमृतेश्वरसह इतर शिवमंदीरात श्रावणानिमीत्त पहिल्या सोमवारी भाविकांच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर मंदीर प्रशासन व स्थानिक समित्यांकडुन जय्यत तयारी करण्यात आली आहे. महादेव मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असुन सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागण्याची शक्यता लक्षात घेउन मंदिर परिसरात बॅरेकेटस उभारण्यात आले आहेत.
मंदीर परिसर स्वच्छ करण्यासोबतच, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुरक्षा याबाबत विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिवभक्तांसाठी विशेष रांगांचे नियोजन करण्यासह गर्दी होणाऱ्या मंदीर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणसार आहे. मंदीरात रात्रभर जागरण-कीर्तनाचे कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. मंदीर परिसरात बेल-फुल, दूध, भस्म, व फुलांची दुकाने थाटण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था व युवक मंडळांकडून भाविकांना सुविधा देण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
श्रावण महिन्यात अन्नदानाचे महत्व लक्षात घेउन विविध सेवाभावी संस्था व भक्तांकडुन भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. दररोज शहरातील विविध भागात होणाऱ्या भंडाऱ्यामुळे भंडारा असलेल्या भागात गर्दी वाढत आहे.