

Heavy rainfall has been recorded in six places in Ambad and Badnapur talukas.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात दोन दिवस दमदार पडलेल्या पावसांनतर रविवारी मंडळात पावसाने दुपारनंतर उघडीप दिली. शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे अंबड व बदनापुर तालुक्यातील सहा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे नद्या व ओढे दुथडी भरुन वाहात असतांनाच जायकवाडी धरणातुन गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी व परतुर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड मंडळात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात ८८, जामखेड ७९, बदनापुर ७९, शेलगाव ७९, दाभाडी ७१, रोषणगाव ७९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत २७९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. बदनापूर शहरासह पिरसावंगी, पाडळी, मात्रेवाडी, शेलगाव यासह इतर आसपासच्या परिसरात शनिवारी पाऊस जोरदार बरसला.
या ठिकाणच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झालें. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान मागील चार ते पाच दिवसापासून जालना जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे.
मुसळधार पावसामुळे कुंभारवाडी ते गोळेगाव या रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातूनच विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. परतुर तालुक्यातील गोळेगाव ते कुंभारवाडी वस्तीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे.
अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ या पुलावरून पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे. गोदावरी नदीपात्रात जायकवाडी धरणातुन पाणी सोडण्यात येणार असल्याने गोदाकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणातुन गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याने अंबड तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या सोळा गावासह घनसावंगी व परतुर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्यावतीने तसे पत्रही जारी करण्यात आले.