

घनसावंगी : मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात समाधानकारक हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामांना गती दिली आहे. शेतातील साफसफाई, नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती आणि मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून आता शेतकरी खत व बियाण्यांच्या खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून यंदा चांगला पाऊस होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी आवश्यक साहित्याची आगाऊ तयारी करत आहेत. कृषी सेवा केंद्रांवर सकाळपासूनच शेतकऱ्यांची वर्दळ दिसून येत असून बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठीही शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या पिकांच्या सुधारित वाणांच्या बियाण्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. विशेषतः उच्च उत्पादन देणाऱ्या व रोगप्रतिकारक क्षमतेच्या वाणांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
अनेक शेतकरी प्रमाणित कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.बियाण्यांसोबतच डीएपी, युरिया, एनपीके, सिंगल सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांच्या खरेदीलाही वेग आला आहे. पेरणीच्या सुरुवातीच्या काळात खतांची कमतरता भासू नये म्हणून अनेक शेतकरी आगाऊ खरेदी करत आहेत.
कृषी सेवा केंद्रांवर खतांच्या दरांबाबत आणि उपलब्धतेबाबत चौकशी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.यंदा मान्सून चांगला राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत अनियमित पावसामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. पावसाने सातत्य राखल्यास सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त केली.
पावसानंतरच पेरणी
पेरणीच्या काळात खत व बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रांनीही पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पावसाची स्थिती लक्षात घेऊन नियोजन करावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर बियाण्यांना चांगली मागणी दिसून येत आहे. अनेक शेतकरी पेरणीपूर्व नियोजन करून आवश्यक निविष्ठांची खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाण्यांची निवड करून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित खतांचा वापर करावा.
किशोर भोसले, कृषी सेवा केंद्र चालक