

Kharif season pre-cultivation in final stage
सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच बळीराजा पुन्हा एकदा शेतशिवारात सक्रिय झाला आहे. ४२ अंशांच्या कडक उन्हात अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही शेतकरी खंबीरपणे उभे राहून पहाटेपासून सायंकाळपर्यंत मशागतीच्या कामात गुंतलेला दिसत आहे.
परिसरातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन तसेच इतर जोडधंदे केले जातात. मात्र या सर्व व्यवसायांचे आर्थिक गणित शेतीवरच अवलंबून असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. असे असले तरी संकटांवर मात करत शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
पूर्वी बैलजोडीच्या साहाय्याने होणारी मशागत आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळली आहे. बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ आवाज आणि पारंपरिक नांगरणीचे दृश्य दुर्मीळ होत चालले असून त्याजागी ट्रॅक्टरच्या आवाजाने संपूर्ण शिवार दणाणून गेले आहे. कमी वेळेत अधिक काम, मजुरांची टंचाई आणि वाढते खर्च यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरद्वारे मशागतीला पसंती देत आहेत.
खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतातील जुने पिकांचे अवशेष हटवणे, नांगरणी, कुळवणी, रासायनिक, शेण खत शेतभर फेकणे, बांध दुरुस्ती तसेच पेरणीपूर्व मशागत करत आहेत. तीव्र उन्हाचा सामना करताना त्रास सहन करावा लागत असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशेचे समाधान आहेत.
खरिपची मशागत म्हणजे संसार उभा करण्याची धडपड आहे. जीव तोडून मेहनत करूनही उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर दर वाढते.