

Potholes on Jalna-Chhatrapati Sambhajinagar road, bad road despite paying toll
बदनापूर, पुढारी वृत्तसेवाः शहरातून जाणाऱ्या जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनचालकांकडून जड वाहनचालकांकडून टाेलच्या नावाखाली पैसे वसूल केले जाऊनही रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना झटके खात प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाहनचालकांमधे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
बदनापूर शहरातून जाणाऱ्या जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्यांमुळे प्रवासी व वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात झाले असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे.
दुचाकीस्वारांनाही या रस्त्यावरून दुचाकी चालविताना संतुलन राखणे कठीण जात आहे. चारचाकी वाहने खड्ड्यांत उडून वाहनांचे नुकसान होत आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने त्याची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघातात वाढ होताना दिसत आहे.
दररोज शेकडो वाहने रस्त्यावरून ये-जा करतात. रस्त्याचा टोल वसुली करणारे ठेकेदार रस्त्याच्या खड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पैसे मोजूनही या रस्त्यावरील प्रवास झटके खात होत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही टोल वसुली करणारे ठेकेदार लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जालना-छत्रपती संभाजीनगर अत्यंत वर्दळीचा महामार्ग असून, या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र बदनापूर शहरातून जाणाऱ्या या मार्गावर खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणा ठरत आहे.