

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जुन्या घरांच्या भिंत पडल्या असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच लोकप्रतिनिधीनीही शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची आस आहे. १६ हजार ९५९ हेक्टरवरील बाधित पिकांपैकी १३ हजार ७३२ हेक्टरवरील पंचनामे करण्यात आले आहेत. सततच्या पावसानंतर हवामान विभागाने पुन्हा २० ते २३ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्टचा इशारा दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हवामान विभागाच्यावतीने २० ते २३ सप्टेंबर तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
शुक्रवारी रात्री जालना शहरात ४४ मिमी पावसाची नोंद झाली. जालना शहरासह जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक तलाव भरले असतानाच काही ठिकाणी तलाव फुटण्याच्या घटनाही होत आहेत. शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, मकासह इतर पिके पिवळी पडली आहेत. २० ते २३ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनाने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालना शहरात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर एवढा होता की, अवघ्या काही वेळ पडलेल्या पावसाची ४४ मिमी नोंद झाली. जिल्ह्यात तळणी ५७, मंठा ४१ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे सोयाबीन पिकात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाच्यावतीने वाधित १६ हजार ९५९ हेक्टरवरील पिकांपैकी १३ हजार ७३२ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्याची वार्षीक सरासरी ६०३ मि.मी. असताना जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत ७०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ११६ टक्के आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असतानाच विहिरीही भरल्या आहेत. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.