

जालना, पुढारी वृत्तसेवा जीवन संपवण्यास कारणीभूत ठरलेल्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना सोमवार दि. ७ रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी, की चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हदीतील नवीन मोंढा भागातील रहिवाशी सुभाषचंद्र बंकटलाल पटवारी (रा. मोदीखाना, जालना) यांनी ५ जुलै रोजी हात उसने व व्याजाच्या पैशाचा तगादा लावल्यामुळे विष प्राशन करून जीवन संपवले होते. या प्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुभाष पटवारी यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात नरेश उर्फ लाला रामेश्वर हटेला व चेतन नंदलाल भुरेवाल यांच्या विरोधात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरुन दोघा विरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश बाळासाहेब पवार यांनी दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुशील चव्हाण व अंमलदार यांचे पथक तयार करून आरोपी नरेश ऊर्फ लाला रामेश्वर हटेला (रा. नाथबाबा गल्ली जालना) व चेतन नंदलाल भुरेवाल (रा. मिशन हॉस्पिटल जवळ जालना) या दोघांना रविवारी रात्री उशिराने अटक करण्यात आले.
सोमवारी या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपितांचा शोध सुरू आहे. कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यच्या मार्गदर्शनाखाली केली.