

Angry farmers jumped into a 60-foot deep well
जालना, पुढारी वृत्तसेवा : समृध्दी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ६६ दिवस उलटले तरीही शासन प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून अधिवेशनाचा एक आठवडा उलटला असताना अद्याप या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आज सोमवारी (ता.७) बाधित शेतकऱ्यांनी ६० फूट खोल कोरड्या विहिरीत उड्या मारल्या. जोपर्यंत जिल्हाधिकारी येऊन लेखी देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
सोमवारी सकाळी बाधित शेतकरी काल केलेल्या घोषणेप्रमाणे कोरड्या विहिरीत उतरले सायंकाळी उशिरापर्यंत ते विहिरीतचं ठाण मांडून बसले होते. त्याचप्रमाणे या आंदोलन स्थळासह रामनगर तसेच सिंधी काळेगाव येथेही अनेक शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले.
सभागृहात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने आंदोलन हाताबाहेर जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून, आंदोलन स्फोटक परंतु निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचले आहे. दरम्यान आंदोलन स्थळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
आ. अर्जुनराव खोतकर यांनी या आंदोलनाबाबत सभागृहात विषय मांडून सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यावेळी आंदोलनाचे प्रमुख दिलीप राठी यांनी या आंदोलनाला ६७ दिवस झाले असून शासन जगूही देत नाही आणि मरूही देत नाही अशी परिस्थिती झाली आहे. शासन, प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.