

जालना ः जालना शहरासह जिल्ह्यात नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.31 डिसेंबर रोजी ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 476 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना 5 लाख 54 हजार900 रुपयांचा दंड केला.
जालना शहरासह जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी 2025 या वर्षाला निरोप तर 2026 या वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेकांनी रात्री उशिरापर्यंत थोडी थोडी पिया करो म्हणत रात्र जागवली.रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत जालनेकरांनी 2025 ला निरोप देताना 2026 चे जल्लोषात स्वागत केले.अनेक भागातील मंदिरात रात्री बारा वाजता भाविकांनी दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.
शहरात ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली. या वेळी ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकरणी 14 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या 94 वाहनचालकांकडून 8 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 10 वाहनचालकांकडून 6 हजार, ट्रीपल सिट 18 चालकांना 18 हजार, नंबर प्लेट प्रकरणी 9 चालकांना 7 हजार 500, लायसन्स नसणाऱ्या दोन चालकांना 1 हजार, विना कागदपत्रे वाहनचालविणाऱ्या 13 वाहनचालकांना 5 हजार, फ्रंटसिटवर बसविणाऱ्या पाच चालकांना 4 हजार 500, नो एंट्रीत प्रवेश करणाऱ्या 9 चालकांवर 9 हजार 500 रुपयांचा, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या 12 वाहनचालकांना 16 हजार, वाहनास काळी काच लावणाऱ्या दोन चालकांना 3 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
जिल्हामध्ये 476 चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आल्या आहेत. यात पाच लक्ष चौपन्न हजार नऊशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या 23 केसेस करण्यात आल्या.
जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिस निरीक्षक यांच्यासह दोन पोलिस उपनिरीक्षक व 25 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांनी विविध चौकांत वाहनचालकांना थांबवून वाहनांची व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी केली.
प्रताप इंगळे, पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा