

धाराशिव :विश्वासाने विक्रीसाठी आणलेला शेतमाल घेऊन त्याचे पैसे न देता 376 शेतकऱ्यांची तब्बल 8 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाजार समितीच्या सचिवांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अडत व्यापाऱ्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील विठ्ठल काकडे (मृत), विठ्ठल श्रीरंग काकडे व मिनील विठ्ठल काकडे (सर्व रा. मार्केट यार्ड, दुकान नं. 28, अडत दुकान लाईन, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींचे मार्केट यार्डात अडत दुकान आहे. त्यांनी 30 सप्टेंबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल विश्वासाने स्वीकारला आणि त्याची विक्री केली. मात्र, मालाची विक्री करूनही त्याचे पैसे शेतकऱ्यांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे धाव घेतली.
सचिवांच्या फिर्यादीवरून गुन्हा
बाजार समितीचे सचिव पवन चंद्रसेन माकोडे यांनी याप्रकरणी 31 डिसेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली. आरोपींनी बाजार समितीच्या नियमांचे उल्लंघन करत आणि 376 शेतकऱ्यांचा विश्वासघात करून एकूण 8 कोटी 81 लाख 89 हजार 857 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.