

जाफराबाद ः तालुक्यातील कमी वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी आता सौर ऊर्जेचा मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत पात्र ग्राहकांच्या घरावर सोलर यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या योजनेमुळे ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांना लाभ मिळणार आहे.
महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांच्या घरावर 1 किलोवॅट क्षमतेची सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे दरमहा होणारा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चेतन मोहकर यांनी सांगितले की, या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच विविध प्रवर्गातील ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून अधिक अनुदान मिळणार असून, सामान्य प्रवर्गातील ग्राहकांनाही नाममात्र खर्चात सोलर सुविधा उपलब्ध होणार आहे.
योजनेसाठी पात्र घरगुती ग्राहकांची यादी महावितरण कार्यालय तसेच लाईनमनकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव यादीत तपासून तत्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बिलात बचत
या योजनेत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांना पाच हजार रुपयांपर्यंत तर इतर ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. सोलर यंत्रणा बसवल्यानंतर वार्षिक वीज बिलात मोठी बचत होण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना वरदान ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्क्त होत आहे.