
Plastic collection and recycling project
जालना, पुढारी वृत्तसेवा : प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या पुढाकाराने रोटरी फाउंडेशन, यूएसएच्या जागतिक अनुदानातून व रोटरी क्लब ऑफ हाउडेन (युनायटेड किंगडम) टी.वी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, सांगली यांच्या सहकार्यान जालना शहरातील जुन्या एमआयडीसीत प्लास्टीक संकलन व पुनर्वापराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पाच्या शिलान्यासाचे अनौपचारिक अनावरण सोहळा डॉ. सुरेश साबू यांच्या हस्ते आणि युनायटेड किंगडममधील रोटरी क्लब ऑफ हावडनचे ग्रँट लीड डेविड साउथवर्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ग्लोबल ग्रॅटचे जिल्हाप्रमुख डॉ. अनुप करवा, डॉ. पराग नेमाडे (ग्रँट लीड), रोटरी क्लब जालना रेनबोचे अध्यक्ष महेश माळी, सचिव गौरव करवा यांची उपस्थिती होती. या प्रकल्पासाठी रोटरी फाउंडेशनकडून (युएसए) जागतिक अनुदान मंजूर झाले असून, सुमारे ४० लाख एवढा खर्च या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.
आधुनिक मशिनरी, प्रशिक्षण व्यवस्था आणि श्रमक्षमतेनुसार स्थानिक महिलांना रोजगार देण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. प्रकल्पामार्फत शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे दररोज संकलन करून ते वेगवेगळ्या प्रकारांनुसार वर्गीकृत केले जाणार आहे. त्यानंतर त्याचा पुनर्वापर किंवा पुनरुत्पादनासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे कचऱ्याच्या समस्येला शाश्वत उपाय मिळणार आहे.
डॉ. सुरेश साबू यावेळी म्हणाले की, रोटरीने सामाजिक भान ठेवून पर्यावरण रक्षणासाठी आदर्श प्रकल्प हाती घेतला आहे. डेविड साउथवर्थ यांनी जालना आणि युनायटेड किंगडममधील क्लबच्या भागीदारीचे हे मॉडेल इतर शहरांनाही प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुप करवांनी प्रकल्पामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन होईल असे सांगितले.