

Jalna Jagannath Rath Yatra devotional atmosphere
जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ ( इस्कॉन) आणि दधिमथी माता (जगदीश) मंदिराच्या संयुक्त विद्यमाने आषाढ शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २७) जालना शहरात भगवान जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.
आजी माजी लोकप्रतिनिधींसह महिला, भाविकांनी उत्स्फूर्तपणे त्यात सहभाग घेतला. यावेळी जगन्नाथाचा रथ भाविकांनी ओढला. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, हरे कृष्णा कृष्णा, कृष्णा, हरे राम, हरे रामा, राम हरे, हरेच्या जयघोषाने बडीसडक परिसर दुमदुमून गेला.
इस्कॉन जालना सेंटरच्या वतीने पाच वर्षांपासून जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यंदाही रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता बडी सडक स्थित दधिमथी माता मंदिर येथे भगवान श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माता यांची विधीवत पूजा -करून रथात विराजमान करण्यात आले. अष्टकम स्तोत्रानंतर आ. अर्जुनराव खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, उद्योजक तथा इस्कॉन युवा कल्याण मंडळाचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल, इस्कॉन जालना सेंटर चे प्रमुख रास गोविंद प्रभू, प. पू. मनोज महाराज गौड यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
भाविकांनी ठिक-ठिकाणी सडा, रांगोळी काढून रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली होती. भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. रथयात्रेत सहभागी भाविकांसाठी फराळ, नाष्टा, पाणी, ज्यूस अशी व्यवस्था करण्यात आली होती. इस्कॉन सेंटरच्या महिला, युवक, युवती, मुली, दधिमथी माता मंदिराचे विश्वस्त, रामाधनी भजनी मंडळासह भाविकांनी भगवंताच्या संगीतमय नामघोषात पाऊली, तालबद्ध नृत्य करीत मनसोक्त आनंद लुटला.
हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा त्यांच्या जन्म स्थळी नऊ दिवसांसाठी जातात. या प्रवासाची आठवण म्हणून दरवर्षी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवसापासून जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा सुरू होते. जालना शहरात सदर रथयात्रेस प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असे इस्कॉन सेंटरचे प्रमुख रास गोविंद प्रभू यांनी सांगितले.