

Fertilizer supply less than demand; Severe shortage in the jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात दोन लाख टन खताचे उद्दिष्ट असताना जून महिन्यात केवळ ८७ हजार मेट्रिक टन खत वितरणासाठी आले आहे. ऐन पेरणीच्या वेळेस डीएपी, युरियास इतर प्रमुख खतांची टंचाई जाणवत आहे. टंचाईचा फायदा घेत काही खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना चढ्या दराने खताची विक्री सुरू केली आहे. मागणीपेक्षा जवळपास १६ हजार मेट्रिक टन खत कमी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात १ हजार ८५ अधिकृत परवानाधारक खत विक्रेते आहेत. ऐन खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर खत टंचाईबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात टंचाईबाबत तक्रारी येत आहेत. खत विक्रेते कृत्रिम खत टंचाई करीत असल्याची ओरड जिल्ह्यात सुरू आहे.
दुसरीकडे खत कंपन्या जाणीव पूर्वक पुरवठा करत नसल्याने शेतकऱ्यांना चढ्या दराने खते खरेदी करावे लागत आहे. जिल्ह्यासाठी २०० लाख मे. टन खताचे उद्दिष्ट आहे. जून महिन्यात ८७ हजार मे. टन खत वितरणासाठी आलेले आहे. युरिया खताचा तुटवडा जाणीवपूर्वक केला जात असल्याच्या तक्रारी आहे. विक्रेते खतासोबत इतर उपवस्तू जबरदस्तीने देण्यात येत असून त्यासाठी युरियाची अट घातली जात आहे. डीएपी खताचीसुद्धा मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या माथी जबरदस्तीने नको असलेले खते व औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.
जालना जिल्ह्याची खताची मागणी एप्रिल ते जून २०२५ पर्यंत युरिया २९ हजार ५३४ मेट्रिक टन तर पुरवठा २२ हजार ४१८ मेट्रिक टन आहे. ७ हजार ११६ मेट्रिक टन युरियाचा पुरवठा कमी होत आहे. डीएपीची मागणी १३ हजार ८८३ मेट्रिक टन असून पुरवठा ८ हजार १७७८७मेट्रिक टन झाला आहे. ५ हजार ७०६ मेट्रिक टन डीएपीचा पुरवठा कमी झाला आहे. एमओपीची मागणी १हजार २३९ मेट्रिक टन असून पुरवठा ५९३ मेट्रिक टन आहे. ६४६ मेट्रिक टन पुरवठा कमी झाला आहे. एसएसपी मागणी १६ हजार १६ मेट्रिक टन असून पुरवठा १२ हजार ५३३ मेट्रिक टन आहे. ३ हजार ४८३ मेट्रिक टन पुरवठा कमी होत आहे. खत कंपन्यांनी फक्त एनपीकेचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त केलेला आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात खताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर खा. कल्याण काळे यांनी बैठक बोलावून आढावा घेतला. बैठकीत अधिकारी व खत कंपन्यांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या. नवीन ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.