

Parents face difficulties due to the rising cost of educational textbooks
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची सुट्टी आता संपत आली असून, येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आणि नवीन मित्रांना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये असली, तरी दुसरीकडे पाठ्यपुस्तकाच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्क्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याच्या वाढ झाली आहे. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला कात्री बसणार असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे..
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सध्या बाजारपेठेत विद्यार्थी आणि पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग दिसून येत आहे. यंदा शालेय साहित्य खरेदीवर महागाईचे सावट दिसून येत आहे. कागद, वाहतूक खर्च आणि मजुरी वाढल्याने बाजारात कच्या मालाच्या आणि कागदाच्या किमती वाढल्याने शैक्षणिक साहित्याच्या किमतीतही १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर, गणवेश, पेन, कम्पास बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आणि इतर स्टेशनरीच्या दरात वाढ झाली आहे. खासगी व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बाजारातून महागडे पुस्तक संच खरेदी करावे लागत असल्याने पालकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. एका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च आता ४ ते ५ हजारांच्या घरात पोहोचला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान एक ते दीड हजार रुपयांची अतिरिक्त झळ पालकांना सहन करावी लागत आहे. अगोदरच मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि त्यातच आता मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्चामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय पालक त्रस्त झाले आहेत.
खासगी शाळांच्या अवाढव्य फीसोबतच आता या साहित्यासाठी ४ ते ५ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. अनेक खासगी नोकरदारांचा 'पगार वाढत नाही, मात्र मुलांच्या शिक्षणाचा खर्च दरवर्षी दुप्पट होत आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टींचे बजेट कसे जुळवायचे?' असा प्रश्न पालकांना पडला आहे. पाऊस लांबल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
कसरत करावी लागणार
केवळ वह्या-पुस्तकेच नव्हे तर शालेय गणवेश, स्कूल बॅग, बुटाचे दरही आवाक्याबाहेर गेले आहे. कपड्यांचे दर आणि शिलाईच्या मजुरीत वाढ झाल्याने शालेय गणवेशाच्या दरातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात मिळणाऱ्या साध्या स्कूल बॅगची किंमत आता ४०० ते ५०० रुपयांच्या पुढे गेली आहे. यामुळे दोन मुले असलेल्या पालकांना तर हा खर्च पेलणे अत्यंत कठीण झाले आहे. यावर्षी डिझेल आणि पेट्रोलच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी आता स्कूलबसच्या भाड्यातही वाढ होणार असून शैक्षणिक खर्चासह आता स्कूलबसच्याही भाडेवाढीमुळे पालकांना अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वर्षभर या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी लागणार आहेत.