

Outbreak of kokda disease on cotton crop at jalna
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कापसाकडे नगदी पीक म्हणून पाहत असतो. मात्र, दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत असते. त्यामुळे उत्पादनात घट येते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे.
अशातच आता कापसाची कोवळी झाडे कोकडात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. गेल्या सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत.
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता यावर्षीही पुन्हा संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र ओलिताची सुविधा नसल्याने बहुसंख्य शेतकरी निसर्गाच्या पावसावरच अवलंबून आहेत.
गेल्या सात दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आता कपाशीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. या रोगामुळे आता शेतकऱ्यांवरच पुन्हा मरणकळा आणाली आहे. पाऊस नसल्याने आणि याआधीही कमी पाऊस झाल्याने कपाशीच्या झाडांना अन्नद्रव्य शोषण करता येत नाहीत. परिणामी कपाशी कोकडात आहे.