

Outbreak of diseases on soybean crop
पारध, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यातील पारध, पद्मावती, अवघडराव सावंगी, पारध खुर्द, लेहा, शेलूद परिसरात शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केलेले सोयाबीन खराब होण्याचे सत्र थांबत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. पेरणीचा काळ देखील निघून गेला असल्याने या शेतात काय पेरावे, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सोयाबीन पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकरी यांच्यावर आली आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी, मका पिकासोबतच सोयाबीन पेरणी केली आहे. यंदा देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी करीत हजारो हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण केली. परंतु सोयाबीन पीक उगवून आल्यावर त्याला उन्नी लागत असल्याचे चित्र या भागात मागील तीन आठवड्यांपासून सतत दिसत आहे. शेतकऱ्यांनी यावर उपाय करण्यासाठी महागडी औषधी फवारणी केली. परंतु सोयाबीन पिकावरील रोगराई कमी होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकरी नाईलाजास्तव सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवत आहे.
ठिकाणी सोयाबीन पिकाला उन्नी अळीने सोयाबीन जळून जात आहे. सोयाबीन पाठोपाठ सततच्या बदलत्या वातावरणामुळे कपाशी व अन्य पिकांवरही रोगराई दिसून येत आहे. कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांना महागड्या कीटक नाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात भर पडत आहे.
मका पिकावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकंदरीतच सतत बदलत्या वातावरणाचा फटका खरिपातील पिकांना बसत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.