

Illegal sand mining continues in Takalkhopa
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील टाकळखोपा-वाघाळा परिसरातील पूर्णा नदीपात्रात भरदिवसा अवैध वाळू उत्खनन सुरू असून, महसूल व पोलिस प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने वाळू काढून सार्वजनिक जागेवर साठा केला जातो. रात्रीच्या वेळेस त्याच वाळूचा टिप्परने मोठ्या प्रमाणावर वाहतूक करून विक्री केली जाते.
टाकळखोपा-वाघाळा मार्गालगत असलेल्या सार्वजनिक जागेचा वापर वाळू साठवणुकीसाठी केला जात आहे. यामुळे शासनाच्या मालकीच्या जागेचा दुरुपयोग होत असून, कारवाई टाळण्यासाठी वाळूमाफियांनी खबरींचे जाळे उभे केले आहे. कारवाईचे संकेत मिळाल्यास अवैध वाळू वाहतूक करणारे तत्काळ पसार होतात. मंठा तहसीलदार सोनाली जोधळे या गेल्या दोन महिन्यापासून रजेवर असल्याने वाळू चोरांचे फावत आहे.
प्रभारी तहसीलदार काळदाते हे अवैध वाळू वाहतूक रोखण्यास पूर्णतः अपयशी ठरले असून भर पावसाळ्यातसुद्धा शासनाच्या महसूलला चुना लावण्याचे काम सुरू आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांचासुद्धा या वाळू चोरीला मूक संमती असल्याचे दिसून येते.
कोण आहे जबाबदार?
अशा बिनधास्तपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननाला पायबंद घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने, यामागे स्थानिक पातळीवरील काहींचे संरक्षण असल्याचा संशय उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांमध्ये यामुळे संतापाचे वातावरण असून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दररोज लाखोंचा गोरखधंदा
टाकळखोपामध्ये दररोज दोन ब्रास वाळूच्या एका टिप्परसाठी तब्बल ६ हजार रुपये वसूल केले जातात. यावरून दररोज लाखोंची उलाढाल सुरू असल्याचा अंदाज आहे. काही प्रकरणांत महसूल आणि पोलिसांवर हल्ले करून गुन्हे दाखल असल्याचे समजते, तरीदेखील ही वाळूचोरी अजूनही सुरूच आहे.