

आन्वा ः रासायनिक खतांच्या सातत्यपूर्ण वापरामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता कमी होऊ लागल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. यामुळे शेणखताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी झाल्याने जादा पैसे मोजूनही शेणखत मिळत नसल्याचे चित्र दिसू येत आहे.
ग्रामीण भागात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू असून खताची मागणी वाढली आहे. शेणखत हे पारंपरिक सेंद्रिय खत असून, शेतकऱ्यांचा आजही या खताकडे कल आहे. परंतु गुरांची संख्या कमी झाल्याने शेणखताचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. पेरणीपूर्व मशागतीचे दिवस जवळ आल्याने शेतात शेणखत टाकण्याची लगबग सुरू आहे. पूर्वी शेतीसोबतच पशुपालन केले जात असे. त्यामुळे शेणखत सहजपणे मिळत होते.
यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या अशा पशुधनाची संख्या घटली आहे. शेणखताचे अनेक फायदे आहेत.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीतील गांडुळांचा वावर वाढतो, पांढऱ्या मु्ळींची वाढ होऊन पीक हंगामात निरोगी राहते, शेणखताचा वापर केल्यास उत्पादन चांगले येऊन उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांना शेणखताचे महत्व आहे.
शेणखताचा तुटवडा
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाकडे आपला मोर्चा वळविला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर वाढला.