Sangli News : ऐन हंगामात खत दरवाढीचा झटका

उत्पादन खर्च वाढणार : शेती करणे झाले महाग : शेतकरी मेटाकुटीला
Fertilizer Price Hike
ऐन हंगामात खत दरवाढीचा झटका
Published on
Updated on

विवेक दाभोळे

सांगली : डिसेंबर 2023 नंतर खतांच्या दरात प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आजअखेर खतांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्केहून अधिक वाढ झाली आहे. आता तर खतांच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. खरिपाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

नुकत्याच झालेल्या दरवाढीत विविध कंपन्यांच्या खत दरात थोडा फरक असला तरी, पोत्यामागे सर्रास 350 पासून 125 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी सामान्य शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरमसाट वाढणार आहे. शेतीकामाच्या ऐन हंगामात खतांच्या दरवाढीचा झटका हा शेतकऱ्यांना बसू लागला आहे. यावेळी 20:20:0:13., 10:26:26, 24:24:00, 19:19:19, तसेच पोटॅश या खतांच्या दरात प्रत्येक पोत्यामागे अनुक्रमे 350 रु., 300, 200, 2225 आणि पोटॅशच्या पोत्यामागे 125 रुपयांची वाढ झाली आहे. जुने आणि नवे दर सोबतच्या चौकटीत दिले आहेत.

शेतकऱ्यांत नाराजी

विविध कंपन्यांच्या खतांच्या किमतीत मे 2021 पासून सातत्याने वाढ होत आहे. याआधी खतांच्या किमतीत सर्वाधिक वाढ ही मे 2021 मध्ये झाली होती. मात्र खतांच्या किमती आता किमान सरासरी 25 टक्केहून अधिक भडकल्या आहेत. मात्र याची शासन पातळीवर काहीच दखल घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांतून यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सर्वसाधारणपणे खतांच्या दरात नोव्हेंबरमध्ये वाढ होते. पण यावेळी एप्रिलचा मुहूर्त साधण्यात आला आहे. प्रथमच विविध कंपन्यांनी खतांचे दर वाढविताना मनमानीपणाचा कळस केलेला आहे. तशी टीका देखील होऊ लागली आहे.

युरियाला मागणी वाढणार

सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत केवळ उसाचेच जवळपास साडेसात लाख हेक्टरच्या घरात क्षेत्र आहे. त्यासाठी जादा उत्पादन वाढीकरिता खतांचा वापर अपरिहार्य ठरला आहे. खतांच्या जोडीला संयुक्त खते देखील वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मात्र आता मिश्रखतांच्या दरात वाढ झालेली आहे. यामुळे तुलनेने कमी दर असल्याने शेतकरी युरियाच्या वापरास अधिक प्राधान्य देण्याचीच शक्यता आहे. यामुळे युरियाची मागणी वाढणार आहे. मात्र दुसरीकडे केवळ युरियाचा वापर केला, तर त्याचा पिकांवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही.

मशागतीचे दर वाढले

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आधीच शेतीच्या महागड्या उत्पादन खर्चाने मेटाकुटीस आलेले आहेत. जोडीला नैसर्गिक संकटे आहेतच! शेतमजुरांकडून होणारी आर्थिक मनमानी लूट आणि अडवणूक वेगळीच! मुळात नांगरणी, खुरटणी, पेरणी त्याचप्रमाणे सरी सोडणे यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर टाळता येत नाही. परिणामी शेती मशागतीचे दर वाढू लागले आहेत. तसेच पिकांना योग्यवेळी, योग्य प्रमाणात खते वापरली नाहीत, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यातच आता खतांचे दर वाढल्याने शेती करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. यातून आता शेती करणे आणि ती पिकवणे देखील अधिकच महागडे होणार आहे, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news