

Online complaint facility for solar agricultural pump problems
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपात बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाईन तक्रार करता येईल, अशी सुविधा महावितरणने उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स कोसळून नुकसान झाले आहे. सौरपंपाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नाही, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी ऑनलाईन व फोनवर करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवर फोन करून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे.
शेतकरी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात. आपला जिल्हा, तालुका, गाव व स्वतःचे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल. शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील.
महावितरणच्या माध्यमातून बसविलेल्या सौर कृषी पंपांविषयी तक्रार असल्यास ती महावितरणच्या टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट -https://www.mahadiscom.in/sola-rŠMTSKP, यासह दिलेल्या ठिकाणी नोंदविता येतील.