

one women and boy drown death at badanapur
बदनापूर, पुढारी वृत्तसेवाः बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे सात वर्षीय भाचा चक्का खेळत असताना चक्का विहिरीच्या दिशेने गेला. चक्क्याच्या मागे धावताना भाचा विहिरीत पडल्याने त्याला वाचविण्यासाठी मामीने विहिरीत उडी घेतली. या घटनेत मामी व भाच्याचा विहिरीत बुडुन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
मालेवाडी येथे बुधवारी (१९) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास भालेराव यांच्या गट क्रमांक १०० मधील शेतात सात वर्षीय रुद्र वैजनाथ थोरात हा त्याचा मामा विलास भालेराव यांच्या गावाजवळील शेतशिवारात खेळत होता.
तो खेळत असताना त्याच्या शेजारीच त्याची मामी आरती विलास भालेराव (२२) या शेतीकाम करत होत्या. यावेळी रुद्र वैजनाथ थोरात हा चिमुकला अवघ्या काही अंतरावर चक्का खेळत होता. चक्का खेळत असताना या चिमुकल्याचा चक्का हा विहिरीच्या दिशेने गेला.
रुद्र हा चक्का पकडण्याच्या नादात विहिरीत पडला. रुद्र विहिरीत पडल्याचे पाहताच मामी धावत आल्या. कसलाही विचार न करता त्यांनी सुद्धा विहिरीत उडी मारली. आरती भालेराव यांना पोहता येत नसल्याने मामी व भाचा विहिरीत बुडाले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आसपास कोणीच नव्हते. आरती भालेराव यांचे पती बदनापूर येथे एका रुग्णालयात उपचारासाठी गेले होते अशी माहिती मिळाली.
ते परत आल्यानंतर त्यांना आरती व रुद्र दिसून आले नाही. त्यांनी आसपास पाहणी करुन विचारपूस केली पण ते कुठेही आढळून आले नाही. मात्र आरतीच्या पायातील चप्पल विहिरीच्या काठावर आढळून आली. त्यांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत तपासणी केल्यावर दोघेही विहिरीत आढळून आले. यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ या दोघांनाही विहिरीत उतरून बाहेर काढले. बदनापूर रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.
गावावर शोककळा
या घटनेमुळे मालेवाडी गावात खळबळ उडाली असून मामी व भाच्याच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिसांत नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.