

Manoj Jarange refuses to take bodyguard with him
वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांना सुरक्षा काढून घेण्याचे निवेदन दिल्यानंतर गुरुवारी (दि. २०) त्यांनी पोलिस अंगरक्षकास गाडीत बसण्यास नकार दिला. यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडेंना वाचविण्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.
अंतरवाली येथे गुरुवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही. तुम्ही धनंजय मुंडेंना वाचविण्याचे काम करत आहात. जर का तुम्ही धनंजय मुंडेंना क्लिनचीट देणार असाल तर ही अवघड बाब आहे.
इतके नालायक सरकार मी आतापर्यंत बघितले नाही. आमचा आता सरकारवरचा विश्वासच उडालाय. तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीपासून टाळायला लागलात, आता तुम्हाला नाकीनऊ आणणार, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.
घातपात प्रकरणात धनंजय मुंडे यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जात नसल्याने जरांगे हे कमालीचे संतापले आहेत. मुंडे यांना फडणवीस, अजित पवार वाचवत असून आता तुम्हाला नाकीनऊ आणतो, असा इशाराच जरांगे यांनी दिला. आता मला मारण्यासाठी कोण कोण येतो ते बघतो असे आव्हान जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिले.