

One person was murdered with a sharp weapon in broad daylight in Jalna city
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील अंबड चौफुलीजवळील जांगडे पेट्रोलपंपाजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी गुरुवारी भरदुपारी पाच वाजेच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेऊन एका इसमाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ या भागात पळापळ झाली. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या जांगड पेट्रोलपंपासमोर गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच जणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील बाबासाहेव सोमधाने यांच्या गळ्यावर व पोटावर वार केले.
अहंकार देऊळगाव येथील ते माजी सरपंच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरदिवसा अचानक झालेल्या या घटनेमुळे या भागातील भाजी विक्रेते व भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची पळापळ झाली. सदर खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची चर्चा ऐकावायास मिळाली.
या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, कदिम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली.