

gutkha worth 71 lakhs has been seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ३१ डिसेंबरअखेर ११३७क्विंटल सुमारे ७१ लाख ७९ हजार ९७० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू विक्री प्रकरणी ८३ गुन्हे दाखल करून सुमारे ८ हजार ४७८ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
त्याची किंमत सुमारे ९ लाख ९९ हजार इतकी आहे. दरम्यान, जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनीयार यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना बीडचे अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांचे सहाय्य लाभणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सीयू ३५०, बीयू १४०० तैनात करण्यात आले आहे. तर या संदर्भात पहिली एफएलसी देखील झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी सांगितले. मतमोजणी मे. सिद्दीकी इंजिनिअरिंग, प्लॉट नं. बी ८/१ जालना, फेज ३, एमआयडीसी एरिया येथे होणार अहे.
भरारी पथकाद्वारे वॉच
महापालिकेचे निवडणूक भयमुक्त आणि निरपेक्ष पार पडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथक स्थापन करण्यात आली आहेत. सहायक खर्च निरीक्षकाची पाच पथके असून, १९ कर्मचाऱ्यांची संख्या आहेत. स्थिर निगराणी पथक, व्हिडिओ निगराणी पथक, भरारी पथक, व्हिडिओ निरीक्षण पथक आदी पथके तैनात करण्यात आले आहेत. सुमारे २८ पथके असून, १७७ कर्मचारी तैनात आहेत.
अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
मतदार केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शहरातील सेंट मेरीज हायस्कूल येथे शनिवार दि. ३ रोजी पार पडणार आहे. यात २९१ मतदान केंद्रांवरील ३२ क्षेत्रीय अधिकारी अधिक सहा राखीव, मतदान केंद्रांवरील आवश्यक कर्मचारी १४०४, मतदान केंद्राध्यक्ष २९१ अधिक ६० एकूण ३५१ तर मतदान अधिकारी क्रमांक १ ते ३ सुमारे ८७३ अधिक १८० असे एकूण १०५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.