

जालना : शहरातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणीत सापडले असताना, राजकीय नेते मात्र श्रेयाच्या स्पर्धेत अडकले असल्याचे चित्र आहे. जालना शहरात आजही आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र झाला आहे. दुसरीकडे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून अस्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका वाढत आहे.
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्यांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना होत नसल्याने महापालिकेची एकूणच अवस्था खस्ताहाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी नेते मात्र सत्ता स्पर्धेत मग्न असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल समर्थकांसह भाजपमध्ये दाखल होताच जालना शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. या प्रवेशामुळे काँग्रेसची पकड सैल झाली असून भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. परिणामी भाजपमध्ये इच्छुकांची रीघ लागली. शिवाय, भास्कर आंबेकर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचीही ताकद वाढली आहे. मात्र, सत्ता आणि प्रशासकीय नियंत्रण असूनही जालना शहरातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, ही बाब सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असतानाही आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अंबडे येथील 35 एमएलडी आणि घाणेवाडी जलाशयावरील 15 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रांची कामे सुरू असली तरी शहराची रोजची गरज 57 ते 58 एमएलडी इतकी आहे.
सध्या केवळ 17 ते 18 एमएलडी पाणी मिळत असून नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 60 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक पाणीसाठा केवळ 28 एमएलडीपर्यंतच मर्यादित असल्याने पुढील अडचणींची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. शहरात सुरू असलेल्या 108 कोटींच्या मलशुद्धीकरण प्रकल्पासोबतच भूमिगत गटार योजनेसाठी नव्याने डीपीआर करावा लागणार असून त्याचा खर्च 600 ते 700 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यातील सुमारे 125 कोटींचा हिस्सा महापालिकेला उचलावा लागणार आहे.
नाराजांमुळे पडणार निकालावर परिणाम
महायुती तुटल्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट आणि अटीतटीची राजकीय लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवाय, भाजपातील निष्ठावंतांना डावलून अनेकांना तिकीट दिली असा आरोप निष्ठावंत करीत आहे. अशा परिस्थितीत या नाराजांची फौज निकालावर परिणाम करणारी आहे. तर नागरिकांचे प्रश्न, याचा फैसला मतदार करणार आहेत.