

परतूर (जालना) : २ सप्टेंबर २०२५ च्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या शासकीय निर्णयाच्या निषेधार्थ आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी परतूर येथे ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या वतीने शासनाच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी "ओबीसीचा डीएनए आहे असे म्हणणाऱ्या दगाबाजांना ओबीसी धक्का न लावता ओबीसी ओबीसीलाच मतदान करणार" असे परखड मत व्यक्त केले.
परतूर रेल्वे स्टेशनपासून ते तहसील कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मंडल आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागासपण दूर करून देशातील मागास जातींना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) आरक्षणाची तरतूद झाली. बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांना सामाजिक प्रतिनिधित्व मिळावे आणि माणूस म्हणून जगता यावे, हा या आरक्षणाचा मुख्य उद्देश होता. या आरक्षणामुळे बलुतेदारांचे प्रतिनिधी शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारणात प्रतिनिधित्व करू लागले.
मात्र, २ सप्टेंबर २०२५ च्या शासन आदेशानुसार मूळ ओबीसींचे अस्तित्व शासनाने धोक्यात आणले आहे, अशी भावना प्रा. हाके यांनी व्यक्त केली. सरकारने जरी आरक्षण धोक्यात आणले असले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एससी, एसटी घटकांना सोबत घेऊन सर्वसाधारणच्या जागांवर सुद्धा निवडणूक लढवणार, असे त्यांनी जाहीर केले. २ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय म्हणजे मूळ ओबीसी प्रवर्गासाठी 'काळा कायदा' आहे, असे वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी केले.
याप्रसंगी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, श्रीमती सविताताई मुंडे, प्राध्यापक विठ्ठल तळेकर आणि बटुळे मामा यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी करवंडे सर, परमेश्वर खरात, अशोकराव गाव, सौंदर्य मधुकर झरेकर, भागवत कडपे, परमेश्वर पोटे, सुभाष जाधव, डॉक्टर त्रिभुवन, नामदेव नाचन, शेख जमीर, परमेश्वर ढवळे, तुकाराम जईद, बाळू गाते, राधाकिसन माने, रुस्तुमराव कुंड, माऊली हजारे, सुनील पोटे, सिद्धार्थ पोटे, गोरख गोटे, अमोल आगळे, बाबासाहेब झरेकर, बाळ आनंद गाढवे, अभिमन्यू गाढवे, ओम प्रकाश गाढवे, गणेश आंबेकर, सुदर्शन राऊत, शिवाजीराव इंगळे आणि इतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक श्री रामप्रसाद थोरात सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री परमेश्वर पोटे यांनी केले. शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री पद्माकर गायकवाड साहेब यांनी निवेदन स्वीकारले.