

'No Stock' boards at pumps; citizens queue up for petrol and gas
जालना, पुढारी वृत्तसेवाः अमेरिका-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाईचे चित्र गडद होताना दिसत आहे. पेट्रोल व गॅससाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक झळकत असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर धाव घ्यावी लागत आहे.
शहरातील काही पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी प्रतीक्षा करूनही पेट्रोल मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता वाढली असल्याने वाहनचालकांमधे नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः नोकरी व शाळा कॉलेजसाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळेही परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. शहरातील काही गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळत असून अनेकांना गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे. काही ठिकाणी गॅस वितरणात विलंब होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
या संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पेट्रोल व गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. इंधन टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्ह्यत मुबलक साठा
जालना जिल्ह्यत २६ पेट्रोल पंप असून पेट्रोल व डिझेलची टंचाई नाही. त्यामुळे वाहनचालकांनी तणावात येऊ नये. काही पेट्रोलपंप चालकांना सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल व डिझेल मागवता न आल्याने तेथे स्टॉक नसू शकतो. मात्र जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याचे पुरवठा अधिकरी सविता चौधर यांनी सांगितले.