

जालना : ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी पुणे येथे मराठा समाजाच्या महिलांबद्दल कथितरीत्या अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप करत जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक बनला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सोमवारी ( दि. 17) कदीम जालना पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत पोलिसांनी नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका यूट्यूबवर वाघमारे यांचे पुण्यातील वक्तव्य दाखविण्यात आले. त्यात मराठा महिलांबद्दल अपशब्द वापरण्यात आल्यामुळे त्यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे असा आरोप कार्यकत्यांनी केला. आंदोलकांनी वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मराठा मोर्चा समन्वयक व संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जालना शहराध्यक्षा सुवर्णाताई वाघ (राऊत) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडुळ, संतोष गाजरे, संदीप ताडगे, विश्वंभर तिरुखे, प्रशांत वाडेकर, नगरसेवक महेश निकम, ॲड. शैलेश देशमुख, गणेश शिंदे, प्रल्हाद शिरसाट, संध्याताई देठे, सुवर्णताई वाघ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी भादंवि 79, 196(1), 353 (2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ॲड. शैलेश देशमुख हे कायदेशीर भूमिका मांडत आहेत.