

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत तब्बल २१ लाख ४६ हजार ४३३ मतदारांचा ठावठिकाणाच मराठवाड्यातील त्या त्या जिल्ह्यांमध्ये अढळला नाही. त्यामुळे या मतदारांची नावे आता यादीतून वगळण्यात येणार आहेत. यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधील ६ लाख १२ हजार मतदारांचा समावेश असून येत्या २४ आॉगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून दावे हरकतीसाठी मुदत दिली जाणार आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मतदारांची संख्या आता घटणार आहे. विभागात एकूण १ कोटी ५७ लाख ९८ हजार ४९६ मतदार आहेत. त्या सर्वाधिक ३२ लाख १६ हजार १६७ मतदार संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आहे. तर त्याखालोखाल नांदेड २७ लाख ७७ हजार ०७३, बीड २१ लाख ९३ हजार ८२७, लातूर २० लाख ४ हजार ४५०, जालना १६ लाख ८२ हजार ७२३, परभणी १५ लाख ४१ हजार ७, धाराशिव १४ लाख १३ हजार ८६४, हिंगोली ९ लाख ६९ हजार ३८५ असा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात ३० जूनपासून एसआयआर मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम ३० जुलै रोजी संपणार होती. मात्र त्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, शेवटची मदतवाढ ही १६ आॉगस्टपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत रविवारीच संपली आहे. त्यामुळे सोमवारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती मतदारांना एसआयआरमध्ये मतदार अर्ज वितरित करून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले, याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार सुमारे ८८ टक्के डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, जी नावे वगळली आहेत. त्यात प्रामुख्याने मृत, स्थलांतर झालेली आणि दुबार नावे असलेल्यांचा समावेश आहे.
१० लाख मतदारांना नोटीस बजावणार
मराठवाड्यात सुमारे १० लाख मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंगच झाली नाही. म्हणजे २०२४ च्या मतदार यादीतील मतदार २००२ च्या मतदार यादीत अढळून आलेले नाहीत. त्यामुळे या मतदारांना आता नोटीस पाठवून दोन महिन्यांत पुरावे सादर करण्यास संधी दिली जाणार आहे.
२४ ऑगस्टला प्रारूप प्रसिद्ध
येत्या २४ आॉगस्ट रोजी एसआयआरच्या मोहीमेनुसार प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात वगळलेल्या २१ लाख मतदारांची नावे राहणार नाहीत. प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर दावे, हरकतींसाठी एक महिना मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर एक महिना सुनावणी होणार असून २२ आॅ क्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.