

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या शासकीय अनुदानात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तीन तलाठ्यांना अटक केली असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण 27 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने वेळोवेळी 4 शासन निर्णय काढून बाधित शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील याद्या अपलोड करण्याचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेती नावावर नसलेली बोगस नावे अनुदानाच्या याद्यांमध्ये समाविष्ट करून, त्या नावांवर जमा झालेली रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी समिती गठीत केली होती. चौकशीत 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपये इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस स्टेशन अंबड येथे 22 तलाठी, तहसील कार्यालयातील 5 कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील 1 कर्मचारी, अशा एकूण 28 आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 28 रोजी सुरज गोरख बिक्कड (वय 36, तलाठी, रा. फतराबाद ता. वाशी जि. धाराशिव, ह.मु. मयूरनगर अंबड), मोहित दत्तात्रय गोषिंक (वय 36, तलाठी, रा. पोलास गल्ली जालना), विठ्ठल प्रल्हाद गाढेकर (वय 38, तलाठी, रा. काचननगर जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. आयोध्या नगर अंबड रोड जालना यांचा अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. मोबाईल फोन व सोशल मीडियापासून दूर राहत ते पोलिसांच्या नजरेआड होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने सातत्याने तपास करून यापूर्वी 20 आरोपींना अटक केली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक, अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे (माऊली), ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी पार पाडली आहे.
चार दिवसांची पोलिस कोठडी
दि. 28 रोजी सुरज गोरख बिक्कड (36, तलाठी, रा. फतराबाद, ता. वाशी जि. धाराशिव, ह.मु. मयूर नगर अंबड), मोहित दत्तात्रय गोषिंक (36, तलाठी, रा. पोलास गल्ली जालना), विठ्ठल प्रल्हाद गाढेकर (38, तलाठी, रा. काचननगर जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. आयोध्या नगर अंबड रोड जालना) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अंबड कोर्ट क्रमांक 2 यांनी आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित फरार आरोपी व एजंटांचा शोध सुरू आहे.