

Nagpur Winter Session MLA Khotkar takes an aggressive stance on the employment issue
जालना, पुढारी वृत्तसेवा : नागपूर तिसऱ्या दिवशी जालना शहरातील युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सभागृहात प्रखरपणे भूमिका मांडली. जालना परिसरातील औद्योगिक प्रकल्प व कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना कमी प्रमाणात रोजगार मिळत असल्याबाबत त्यांनी यावेळी सरकारचे लक्ष वेधले.
आ. अर्जुनराव खोतकर हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की, स्थानिक लोकांनी कंपनीकरिता स्वतःच्या जमिनी दिल्या. या पार्श्वभूमीवर कंपनीनेही स्थानिक लोकांना रोजगार देणे गरजेचे आहे. जालना शहरातील कंपन्यांनी स्थानिक युवकांना रोजगार देणे ही त्यांची सामाजिक जबाबदारी असून किमान ८० टक्के स्थानिकांना नोकरी देणे बंधनकारक केले जावे. तसेच कामगारांना नियमांनुसार वेतन देण्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी खोतकर यांनी सभागृहात केली.
या विषयावर सर्व माहिती त्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना सभागृहात अवगत करून दिली. कामगारांच्या वेतनातील तफावत, अतिरिक्त कामाचे मानधन न मिळणे आणि बाहेरच्या कामगारांना प्राधान्य देण्याच्या तक्रारी या मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला.
स्थानिक काही कंपन्यांशी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांची सांगड असल्यामुळे, संबंधित अधिकारी दोन दोन वर्षे कंपन्यांची नियमित पाहणी करत नाहीत. तसेच कामगारांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारी दूर करण्यासाठी ते प्रत्यक्ष भेट देखील देत नसल्यामुळे कामगारांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी यावेळी केला. त्यामुळे जिल्हा कामगार अधिकारी कंपन्यांना पाठबळ देत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या या मागणीला सभागृहाने सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
शहरातील तरुणांकडून स्वागत
जालना शहरातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे शहरातील तरुणांकडून स्वागत होत आहे.